Thursday, 28 April 2011

Cubical

दिवसातला सगळ्यात जास्त वेळ जर आपण कुठे काढत असू, तर तो office मध्ये.... आपल्या डेस्क वर! माझ्या cubical मध्ये आम्ही ३ लोकं बसतो. बसतो कसले धिंगाणा घालतो... आजूबाजूच्यांना काय वाटेल याचं कधी भान ठेऊन, तर कधी न ठेवता आम्ही आमचं काम, मस्ती आणि थोडक्यात office life share करतो! त्याच माझ्या लाडक्या cubical मधल्या दोस्तांसाठी...

कधी कधी मला वाटतं,
college अजून नाहीच संपलं...
मस्तच असतं कारण खूप,
वातावरण आमच्या cubical मधलं!

गप्पांचे फड जमतात इथेच,
जणू group चा असावा कट्टा,
कामाच्या अडचणी पण सुटतात,
कधी.. लागताच नाही पत्ता!!

उजवीकडे सचिन, मागे राजश्री,
तिसऱ्या टोकाला बसलेली मी,
तिघेही मिळून चालू असते,
खेचाखेची, धम्माल अन हसाहसी!!

मैत्रीचा नाजूक धागा पण,
बांधला गेलाय तीनही टोकांशी,
अलगद, हळुवार गोष्टीही होतात,
अगदी सहज share एकमेकांशी!

कधी खोटे, कधी खरेखुरे,
रुसवे, फुगवेही होतात इथेच...
टिकत नाहीत फार काळ,
विसरले जातात नकळत लगेच!!

कधी कधी मला वाटतं,
हे आहे आमचं घरंच...
जिव्हाळा, काळजी आणि आधार,
घरासाठी इतकंच पुरतं, खरंच!!!

Tuesday, 26 April 2011

भांडणं

भांडण प्रत्येक नात्यातला एक नकोसा पण अविभाज्य भाग! त्यात ते नातं... त्याचं आणि त्याच्या तिचं असेल तर मग विचारायलाच नको! एकमेकांच्या  असण्याने जी गम्मत येते , त्याचाच एक भाग म्हणजे, ही भांडणं !!

तुझ्या अन माझ्या पत्रिकेतले, जमतच नसतील कुठलेच गुण,
प्रत्येक discussion चा शेवट होतो, म्हणूनच कडाक्याच्या भांडणातून!

कारण अगदी कोणताही चालतं, कधी माझा ड्रेस नवीन आणलेला,
कधी माझी आवडती serial, किंवा कधी स्वयंपाक थंड झालेला...

कधी झालेला तुला उशीर, कधी न सांगता येणं लवकर,
कधी न उचललेला माझा कॉल, कधी sms ला न दिलेलं उत्तर !!

दोघं तोंड फिरवून झोपतो मग, अगदी विरुद्ध दिशांना बघत...
झोपतो कसले तेव्हा, रुसूनच बसायचं क्षण क्षण जागत!! 

अशातच मग एकाने टाकायची शस्त्र, सोडून बघायचा अबोला,
मस्तपैकी चहा घेऊन खिडकीशी, "ये ना" म्हणायचा चहा घ्यायला! 

खिदळत हसत मग, चहा बरोबर भांडण पण टाकायचं पिऊन, 
आणि मग म्हणायचं चला आता झोपायला, हातात हात घेऊन! 

त्यातच करायचा दिवा कोणी बंद, यावर परत discussion निघतं 
तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून जगवेना, तेव्हा अगदी पक्कं पटतं






Saturday, 23 April 2011

शोधून बघ

कधी कधी आपण आपल्या माणसाच्या अगदी जवळ असतो, प्रत्येक क्षण  एकत्र  घालवून पण  कुठेतरी काहीतरी मिसिंग वाटतं....आणि मग तेव्हा खरी गरज वाटते आपल्या त्या माणसाला शोधून बघायची! ती साथ ती सोबत परत मिळवायची ! असंच काहीसं  जेव्हा तुला वाटेल तेव्हा, तू मला शोधून बघ...

जेव्हा जाणवेल आपण नाही सोबत,
आणि वाटलं तुला मला  शोधावसं  जर...
शोधून बघ लांबच्या त्या झाडाखाली,
जिथे गोंजारली आपण ती पहिली सर....

एकदा फक्त शोधून बघ तू,
अल्लड, उनाड आपल्या त्या वेड्या झऱ्याकाठी...
बिचकत घातली होतीस तू,
अधीर आतुरशी ती पहिली हळूवार मिठी....

नंतर शोधून बघ मला तू,
गर्द हिरव्या राई लगतच्या कुंपणाच्या जवळपास...
हातात हात गुंफुनच जिथे आपण
डोळ्यांमध्ये एकमेकांच्या मग गुंगून जायचो तासनतास...

शोधून बघ मग मला तू,
जुन्या देवळामागच्या त्या मोडक्या पायऱ्यांवर....
वाट पाहिल्यानंतरची भेटही व्हायची तिथेच,
स्पर्शाची जेव्हा तुझ्या ओढ व्हायची अनावर...

मला शोधताना तू विसरू नकोस,
धुक्यात हरवणारी ती आपली छोटीशी पायवाट....
नवी सकाळ पहायची एकत्र म्हणून,
तिथेच तर घालवायचो, शरदाची पहिली पहाट....

तरीही जर सापडले नाहीच तुला,
तर मनाचे शोधून काढ कोपरे सारे...
तुझ्यातच सापडेन तुला मग मी,
असतील फक्त डोळ्यांचे ओले ओले किनारे...