काहींना हवासा, तर काहींना नकोसा... कसाही असला तरी दर वर्षी पाऊस येतोच! त्या पावसात भिजणारे तो आणि ती, बदलत राहतात पण भिजणाऱ्या त्या दोघांच्या भावना बदलत नाहीत... आणि पाऊस, तो तर नाहीच नाही.....
त्याला हवं असतं, पावसाने नेहेमीच यावं अवेळी,
मग एकाच छत्रीखाली, दोघांना येतं एकत्र चालता,
प्रत्येक झुळुकीबरोबर उडू पाहणारी ओढणी तिची,
सावरताना तिची होणारी धांदल जवळून येते अनुभवता!
अर्ध्या छत्रीखाली, ती अर्धवट भिजत थोडीशी शहारते,
वीज कडाडली की, तिच्याही नकळत त्याच्याकडे सरकते...
मग त्या उडणाऱ्या ओढणीचा, त्यालाही होतो स्पर्श,
त्या निसटत्या स्पर्शानेही त्याचे, मन वेडे हरखते!
अशातच जर सरीने, कोसळून दिली त्याला साथ,
तर विचारता येतं त्याला, "थोडा वेळ थांबायचं?"
कमी नको होऊस, करून पावसाची विनवणी मनात,
तिला मात्र, "थांबेलच इतक्यात पाऊस", हसून म्हणायचं!
ती सुद्धा हळूच गालात हसून, नुसतीच हुंकारते,
छत्रीबाहेर कोसळणाऱ्या पावसाचे, ती मानते आभार मनोमन!
ओढणी पसरून भरून घ्यावे वाटत असतात तिलाही,
गार पावसातही स्पष्ट, त्याच्या अस्तित्वाच्या उबेचे क्षण!!
तिला नाही वाटत भीती विजेची, तरीही मुद्दाम,
त्याच कारणाने ती छत्रीच्या आणखी येते आत,
तिला आवडतं त्याचं चुळबूळण, तिला जागा देताना,
चुकूनच स्पर्शणारे, त्याचे थंड पण थरथरते हात!
एका छत्रीत चालताना, तिचं राहत नाही लक्ष,
फक्त जाणवतं तिला, त्याचं तिच्या नकळत तिला निरखणं!
पाऊस वाढवा इतकीच इच्छा मनात ठेऊन त्याचं,
तिची समजूत काढत, तिच्या बरोबरीने भिजत थांबणं!
तिला असतं ठाऊक, त्याला नकोय तिने जायला,
पण थांबवता येत नाही, वेळ पुढे जाणारा!
म्हणूनच हवा वाटतो तिलाही, तो अवेळी पाऊस,
तिची वाट त्याच्यासाठी, न सांगताच अडवून धरणारा!!