Sunday, 2 November 2014

पाऊस

"पाऊस", एखाद्या नातेवाईकासारखा असतो… कोणाला दूरचा तर कोणाला अगदी जवळचा वाटतो !!   
मला दिसलेल्या पावसाच्या छटा काहीश्या अश्या होत्या …… 
                              

पाऊस प्रत्येक मनात असतो साठवलेला 
कधी चुकून कधी मुद्दामून असतो आठवलेला 

कोणाला आठवतो पाऊस पहिल्या प्रेमाचा 
चिंब भिजलेल्या फक्त त्या दोघांचा 

कधी कोणा मैत्रीचा पाऊस आठवतो 
गरम कॉफीचा वास पुन्हा गप्पा मारून जातो 

कोणा कधी आठवतो निव्वळ बनून फजिती 
हसले होते खदखदून जेव्हा सारे सखे सोबती 

वादळाचा पाऊस आठवतो कोणा 
ताज्या वाटतात क्षणिक त्याच्या जुन्या खुणा 

पण मला आठवतो पाऊस  तुझ्या डोळ्यांतला 
मी दूर जातांना हळुवारपणे बरसलेला !!

Tuesday, 31 July 2012

कंटाळा


घड्याळाचे काटे कुठे अडकलेत वाटतंय,
मिनिटे संपायची वाट पहात तासभर गेलाय
वेळेवरच दरवेळी पुढचं टाकून पाऊल,
आता वेळेलाही पुढे जायचा कंटाळा आलाय

दुपारच्या उन्हांनाही बदलायची नाहीये जागा,
त्याच खिडकीतून येऊन आत राहिलीत लोळत
पडलेल्या हवेने जराही न हलता,
कंटाळ्यानेच थोड्याशा केलीये त्यांना चांगली सोबत


गच्च भरून साठलंय पाणी ढगांमध्ये,
कंटाळ्याने त्यांना त्यांचाच ओझं नाहीये झेपत
आळसावून वाट पहात बसलंय जणू,
कंटाळवाणा पाऊस, हट्टाने नाहीये अजिबात बरसत

सरळसोट, सपाट कंटाळवाण्या रस्त्याला त्या,
नाहीत अवघड चढ ना धडधडते उतार
त्यालाच त्याचा येतो कंटाळा आता,
कंटाळ्यानेच  बदलासाठी होतच नाही तरी तयार

नसेलही यातलं कोणी कंटाळलेलं आत्ता,
माझी नजर बदलून तिकडे बघायला हवय
आत्ता नको जरा वेळाने बघू,
आत्ता ना मला जरा कंटाळा आलाय....    

Tuesday, 14 February 2012

तुझी सावली


आभाळाबरोबरच मनातही माझ्या,
तुझ्या आठवणींचे ढग दाटतात
प्रत्येक  थेंबाबरोबर पावसाच्या
माझ्याही डोळ्यांत श्रावणसरी साठतात

खिडकीबाहेर आदळतात सरी
आतून  एकाकी  श्वास  निसटते
धूसर झालेल्या काचांवरही
तुझेच नाव कसे उमटते


मखमली हवेसोबत उडतात,
पानगळीसारख्याच आठवणी तुझ्या मनभर

कमालीचा धरतात वेग,
सावरताना त्यांच्यातच हरवते क्षणभर

तुझ्या नसण्याने काळोखते,
बुडणाऱ्या सूर्यबिंबाची कोवळी लाली, 
चमचमती पौर्णिमाही तुझ्याशिवाय,
होते अमावस्येहूनही गडद काळी


शोधताना रस्ता अंधारात,
तुझ्या सोबतीची  किरणंच  हरवली

मार्ग झाले निराळे
साथीला उरली तुझी सावली...

Wednesday, 14 September 2011

सोनसखे....

मैत्रीण... कधी ती आपली आई असते पुढच्या क्षणाला आपली मुलगी... घटकेत आधार देणारी असते, तर घटकेत मागणारी! कधी खूप हवी हवीशी कधी अगदी नक्को वाटणारी... 
माझ्या आयुष्यात मला मैत्रिणी फक्त बरोबरीच्या नाही मिळाल्या, कधी आई, कधी बहिणी, कधी आजी, कधी आत्या तर कधी मामीने माझ्या मैत्रिणी झाल्या. खरं तर हि कविता, इथे नाव नसताना ज्या ज्या माझ्यावर हक्काने चिडून भांडतील अशा सगळ्या मैत्रिणींसाठी... 

कधी सडा सुगंधी तू पारिजातकाचा, 
कधी कळी अबोलीची नवखी ग...
सदाफुली तू, हसरी , भाबडी, निरागस,
दरवेळी नवी, माझी सोनसखी ग!! 

कधी थंडीचं होतेस ऊन कोवळं,
कधी असतेस उन्हातली शांत दुपार...
कधी असतेस नुसतंच भरलेलं आभाळ,
कधी असतेस पावसाची सर धुव्वाधार!! 

कधी देतेस दिशा , असताना भरकटत, 
अन त्याच प्रवासात देतेस साथ...
कधी नकळत जातेस हरवूनही अशीच,
मग सापडताच नाहीस घालूनही साद !!

हवासा वाटल्यावर मला आधार भक्कम,
घ्यायला मग सांभाळायला धावून येई...
कधी शोधात राहतेस तूच आडोसा,
होतेस नाजुकशी हळवी जाई जुई!! 

कधी माझाच होतो भास तुझ्यात, 
कधी उमजूनही भासतेस अनोळखी ग ...
जितकी माझ्यासारखी कधी तितकीच निराळी  ,
दरवेळी नवी, माझी सोनसखी ग!! 

हवं आहे

कधी कधी नक्की काय हवंय ते कळायच्या आधीच, ते हातातून निसटून जातं... आणि मग स्वतःनीच स्वतःला सावरायची वेळ येते... पण तीही वेळ शाश्वत नसतेच... कोणीतरी म्हणून गेलाय "वेळ चांगली असो किवा वाईट, सरतेच!!" अशाच एका दृष्टिकोनासाठी... 
 
मुठभर माती हवी आहे,
स्वप्नं रुजत घालायला
थोडेसे ढग हवे आहेत,
हलकेच त्यांवर बरसायला

हवा आहे कुपिभर सुवास,
कोवळ्या स्वप्नांवर शिंपडायला
हवे आहेत ओंजळभर रंग,
नवखी स्वप्न रंगवायला

मग हवे चिमुकले पंख,
स्वप्नांना उडू द्यायला
हवे आहेत पापणिभर अश्रू,
अस्तित्वाचं भान राखायला

हवा आहे मनभर ध्यास,
या स्वप्नांना पूर्ण करायला
आणि हवय खंबीर मन,
मोडलीच स्वप्न तर मला सावरायला

Sunday, 28 August 2011

किंमत


आपण सगळेच आपल्या स्वप्नांवर जीव तोडून प्रेम करतो. अशाच एखाद्या जीवापाड जपलेल्या स्वप्नाला कधीतरी  सोडून द्यावं लागलं तर?? कोणत्याही दुसऱ्या गोष्टीसाठी स्वप्नाची हि मोजायला लागलेली किंमत नक्कीच महाग पडते.... हो ना??

कधी साखरझोपेत अलगद बदलली कूस 
कधी पाहिलेली आपल्याच झोपेची वाट
प्रत्येक स्वप्नाची किंमत लागते मोजावी,
आपणच बनवलेल्या स्वप्नाच्या या जगात

रापलेल्या  उन्हात, पावलागणिक  हरवतात  सावल्या
आणि पुरून  उरतो  एकाकी  रस्ता  
मनभर  पसरलेला  ध्यासही  आटतो  तेव्हा ,
उभारी  विसरतो  खाऊन खाऊन  खस्ता

काळाबरोबर  निसटते   घट्ट  धरलेली  उमेद
विझणाऱ्या आशेला  आणखीनच  करते  फिकट
डोळ्यांदेखत  अंधुक  झालेल्या  संधी  बरोबरच,
विश्वासाच्या  कड्याही  हळूहळू  जातात  निखळत

आपलेच  ध्यास  आणि  आपलेच  हट्ट,
आपलीच  इच्छा  आणि  आपलीच  जिद्द
स्वतःशीच  स्वतःने  दिलेला  लढा  अन,
प्रयत्नाची  पार  केलेली  प्रत्येक  हद्द

अथक प्रयत्नांच्या जोडीला  केलेल्या  प्रार्थना
त्यांनाही  जेव्हा  उत्तर  नाही  मिळत....
हातात  नसलेल्या  पण  हातावर  पसरलेल्या ,
नशिबाच्या  रेघोट्यांच  गणित  जातं  कळत

स्वप्नांच्या  पलीकडल्या  सत्याची  धग  परतवते,
कठोर  पण  शाश्वत  या अस्तिवात ....
कधीकधी द्यावी लागते स्वप्नाचीच  किंमत,
आपणच  बनवलेल्या  स्वप्नाच्या या जगात...

Monday, 4 July 2011

आठवणी


प्रत्येकाकडे असलेला, स्वतःचा हक्काचा खजिना, म्हणजे आपल्या आठवणी! काही हव्याशा तर काही तेवढ्याच नकोश्या! कितीही जुन्या  साठल्या तरी, नवीन साठवून ठेवतोच आपण...  आणि कळत नकळत परत परत आठवून पाहतो! अशाच खास आठवणींसाठी....


जुन्या  वहीत  दडवलेला  एक  गुलाब  सुकलेला,
कितीही  झाला  जुना  तरी  राहतो  दरवळत,
काळाच्या  ओघात  मिटलेल्या  आठवणी  करतो  ताज्या

मनही  त्यांना  अलगद  राहते  नव्याने  कुरवाळत...

कुठेसा  साठून  राहिलेला  अश्रूंचा  पाट  मग,
होतो  मोकळा  करून  दूर  सारे  अडसर
बांध  घालूनही  त्याला  होतं  थांबवणं  कठीण,

आठवणीतच  जगतो  तेव्हा, पडतो  आजचा  विसर

यातच  आठवते,  हळूच  झालेली  हलकीशी  गुदगुली
उसळून  वाहतो,  खळखळता  हसूचा  झरा  निर्मळ
परत  होतात  रंगीत  मग  हसऱ्या  आठवणी,
पुन्हा  एकदा  भरून  वाहते  आठवणींची  ओंजळ


आठवणीतूनच  करताना  भूतकाळाचा  प्रवास, नकळत  सापडतात,
रागाचे  नकोसे  शहारे,  कधी  प्रेमाचा  ओलावा
न  शोधातही  सापडतात  त्या  क्षणात  मग
हवीहवीशी  कधी सोबत, कधी  नकोसा  दुरावा...


पुढे  जाता  जाता  आठवणीतून  या  साऱ्या
सापडतो,  जुना  पण  परिचित  मैत्रीचा  सुंगंध!
अनावधानाने  आठवून  जातो  मनात  खोलवर  लपलेला,
नाव  न  दिलेला , हळवासा, नाजूक  रेशीमबंध


काल  धावतच  राहतो, अथक  न  थांबता,
एकाच दिशेने  जाताना, नाही  मागे  फिरत....
हवासा  असतो  गेला  काल  आपल्याला  म्हणूनच
आठवणींच्याच  रूपाने  तो  भेटत  राहतो परत!