प्रत्येकाकडे असलेला, स्वतःचा हक्काचा खजिना, म्हणजे आपल्या आठवणी! काही हव्याशा तर काही तेवढ्याच नकोश्या! कितीही जुन्या साठल्या तरी, नवीन साठवून ठेवतोच आपण... आणि कळत नकळत परत परत आठवून पाहतो! अशाच खास आठवणींसाठी....
जुन्या वहीत दडवलेला एक गुलाब सुकलेला,
कितीही झाला जुना तरी राहतो दरवळत,
काळाच्या ओघात मिटलेल्या आठवणी करतो ताज्या
मनही त्यांना अलगद राहते नव्याने कुरवाळत...
कुठेसा साठून राहिलेला अश्रूंचा पाट मग,
होतो मोकळा करून दूर सारे अडसर
बांध घालूनही त्याला होतं थांबवणं कठीण,
आठवणीतच जगतो तेव्हा, पडतो आजचा विसर
यातच आठवते, हळूच झालेली हलकीशी गुदगुली
उसळून वाहतो, खळखळता हसूचा झरा निर्मळ
परत होतात रंगीत मग हसऱ्या आठवणी,
पुन्हा एकदा भरून वाहते आठवणींची ओंजळ
आठवणीतूनच करताना भूतकाळाचा प्रवास, नकळत सापडतात,
रागाचे नकोसे शहारे, कधी प्रेमाचा ओलावा
न शोधातही सापडतात त्या क्षणात मग
हवीहवीशी कधी सोबत, कधी नकोसा दुरावा...
पुढे जाता जाता आठवणीतून या साऱ्या
सापडतो, जुना पण परिचित मैत्रीचा सुंगंध!
अनावधानाने आठवून जातो मनात खोलवर लपलेला,
नाव न दिलेला , हळवासा, नाजूक रेशीमबंध
काल धावतच राहतो, अथक न थांबता,
एकाच दिशेने जाताना, नाही मागे फिरत....
हवासा असतो गेला काल आपल्याला म्हणूनच
आठवणींच्याच रूपाने तो भेटत राहतो परत!