एकटेपण कधी कधी खूप असह्य व्हायला लागतं! जगातले सगळे नियम, सगळ्या सूचना नकोशा वाटतात! आणि उरतो फक्त दाट अंधार... आपण प्रत्येकानेच कमी अधिक काळासाठी हे क्षण अनुभवलेले असतात... फरक फक्त असतो तो कोणाचा आधार आपण शोधू पाहतो त्याचा!
आई हे बघ ना इथे ,
बोचतंय काहीतरी मनाच्या एका कोपऱ्यात
फुटक्या स्वप्नांच्या काचा आहेत बहुतेक,
तुझ्या हळुवार स्पर्शाने निघतील झटक्यात!
आई हे बघ ना इथे ,
मनात कुठेतरी सारखं सारखं ठसठसतय
विनाकारण जगाने दिलेल्या शिक्षांमुळेच असेल,
भोगताना तुझा आधार हवाय वाटतंय
आई हे बघ ना इथे ,
मनात भळभळतीये सारखी एक जखम
कदाचित एकटेपणाने झालीये मला ती,
तू ये, नको दुसरं मलम
आई हे बघ ना इथे ,
काहीतरी आतल्या आत तुटत चाललय
माझा स्वतःवरचा विश्वास असावा तो,
तुझे दिलास्याचे शब्द तो मागतोय!
आई हे बघ ना इथे ,
भर दिवसाही दिसतोय मिट्ट काळोख
सगळंच वाटतंय इथे अनोळखी मला,
पटतिये फक्त तुझ्या कुशीची ओळख
आई हे बघ ना इथे ,
मला माझं स्वत्वही नाहीये सापडत
तुझ्यातच ठेव मला कायमची दडवून
जन्म नकोच या जगात परत.....
wowww....farach bhariee...tipu tai keep it upp...:)
ReplyDeleteIts awesome.....had tears drop down my eyes after reading it
ReplyDelete